अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी पोलिसांनी सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन, सोलापूरनंतर अकोल्यातूनही भरला उमेदवारी अर्ज - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयापासून मिरवणूक काढली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल केले.
लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आंबेडकरांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयापासून मिरवणूक काढली आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या हजारो कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी भीम सैनिक दल तसेच पोलिसांचाही मोठा ताफा होता. ही मिरवणूक टॉवर चौक, गांधी चौक, पंचायत समिती मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली.
आंबेडकर अर्ज दाखल करण्यासाठी येण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटरच्या आत शेकडो कार्यकर्ते आधीपासूनच त्यांची वाट पाहत होते. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला करत फक्त पाच जणांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवले. यावेळी आंबेडकरांनी डोक्यात मुस्लीम टोपी, भगव्या रंगाचा शर्ट आणि गळ्यात विविध समाजाच्या परंपरेनुसार माळा घातलेल्या होत्या. त्यांच्या या वेशभूषेने ते वंचित बहुजनांना एकत्रित केले असल्याचे दाखवत होते, अशी चर्चा होती. आंबेडकर हे अर्ज दाखल करून आल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला.