अकोला- पशुसंवर्धन विकास मंडळ कार्यालय नागपूर येथे हलविण्यात येत आहे. मात्र या निर्णयामुळे संतप्त झालेल्या प्रहार कार्यकर्त्यांनी या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. राज्य सरकार अकोल्यातील कार्यालय दुसरीकडे कसे काय स्थलांतरित करू शकते, असा सवाल उपस्थित करत प्रहार संघटनेने त्यास विरोध केला आहे.
प्रहार संघटनेकडून साहित्याची तोडफोड
2006 मध्ये अकोल्यात राज्यातील पशुसंवर्धन विकास मंडळ स्थापन झाले होते. त्यानंतर येथूनच राज्याचा या विभागाचा कारभार सुरू होता. मात्र, हे कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, त्याला येथील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर सरकारने याबाबत सावध भूमिका घेतली होती. तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही हे कार्यालय दुसरीकडे जाणार नाही, असे म्हटले होते.
पशुसंवर्धन विकास मंडळाच्या स्थलांतराला विरोध दरम्यान, हे कार्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्याचे आदेश फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकारने काढले. त्यानुसार याबाबत येथील साहित्य हलविण्यात येत होते. ही माहिती प्रहारच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी तिथे धडक दिली. यावेळी ज्या ट्रकमध्ये हे साहित्य टाकण्यात येत होते, त्याच ट्रकला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे या प्रकरणात राजकारण तापले आहे.
भाजपनेही केले टाळे ठोको आंदोलन
या प्रकारविरोधात भारतीय जनता पक्षाने या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन केले. नगरसेवक गिरीश जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे तेजराव थोरात, अॅड. देवशीष काकड, हरिभाऊ काळे, नगरसेवक अजय शर्मा, बाळ टाले, विजय इंगळे, प्रशांत अवचार यांच्यासह आदी उपस्थित होते.