अकोला- एका अल्पवयीन मुलाने युवकाचा क्षुल्लक कारणावरून चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना अकोट शहरातील धारुळी वेस येथील मोबिन अली जामीन अली यांच्या घरासमोर घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मुदास्सीर अली मुक्तार अली असे मृत युवकाचे नाव आहे.
अकोटमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाचा धारदार शस्त्राने खून; अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन अल्पवयीन आरोपीने मुदास्सीर अली मुक्तार अली याच्यावर चाकूहल्ला केला. यात जखमी झाल्याने मुदास्सीरचा मृत्यू झाला. या घटनेबाबत अकोट शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मुदास्सीर अली मुक्तार अली याचा लहान भाऊ मुसादिक याचे सोबत अल्पवयीन आरोपीचे रमजान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'तू माझ्याकडे डोळे वटारून का बघतो, या कारणावरून भांडण झाले होते. याच कारणावरून अल्पवयीन आरोपीने मुदस्सीर अली याच्यावर चाकूने छातीच्या डाव्या बाजूला सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. मुदास्सीरअली मुक्तार अली याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविले. अकोला येथील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
मृत युवकाचे काका मोबिन अली जामीन अली यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले करत आहेत.