अकोला- जिल्ह्यातील अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने मागील 10 वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी 1 महिन्याच्या निवासी सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराची सुरुवात विदर्भ माऊली संत वासुदेव महाराजांनी 60 वर्षांपूर्वी केली होती. तोच वारसा संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अखंडपणे चालवत आहे.
अकोल्यात सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन - आयोजन
जिल्ह्यातील अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने मागील 10 वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी 1 महिन्याच्या निवासी सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन करण्यात येते.
या शिबिरात मुलांना अध्यत्मिक शिक्षणासह खेळ, योगासन आदीचे धडे दिले जातात. बालवयात मुलांवर केलेले संस्कार हे कायम लक्षात राहतात, या उद्देशाने अध्यात्मिक सामजिक सेवेचा वसा घेतलेल्या या संस्थेचे बालविकास शिबीर अकोटमधील श्रद्धासागर या निसर्गरम्य परिसरात आयोजित केले जाते. यामध्ये दररोज पहाटे उठणे, प्राणायाम करणे, संस्कृत पठण, हरिपाठ, पारंपारिक वाद्य वादन, मर्दानी खेळ, पोवाडा, गायन, वारकरी संप्रदायातील संस्कृत श्लोक यासह मानवी जीवनाचा अभ्यास करत जगण्याची कला मुलांना शिकवली जाते.
2001 साली स्थापन झालेल्या वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे कार्य आज देशभरात परसले आहे. सामाजिक सेवेचा वारसा लाभलेल्या या संस्थेने पंढरपूर येथे भक्तांसाठी धर्मशाळा उभारली आहे. देशात पाश्चात्त्य संस्कृतीचे होणारे अनुकरण थांबवण्यासाठी व विद्यार्थी दशेतील पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने कोणताही शुल्क न घेता हा उपक्रम नव्या पिढीतील मुले घडवण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे.