अकोला - शहराची तहान भागवणारा प्रकल्प म्हणून 'काटेपूर्णा धरणाची' ओळख आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरिही या प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. वाशिम आणि मालेगाव परिसरात पाऊस पडल्यास काटेपूर्णा प्रकल्पात पाणी जमा होते. यावर्षी वाशीम जिल्ह्यात अजूनही पावसाने अपेक्षीत हजेरी लावलेली नसल्याने, त्यामुळे या प्रकल्पात नवीन पाण्याचा एक थेंबही जमा झालेला नाही.
अकोल्यातील 'काटेपूर्णा' प्रकल्पाला पाण्याची प्रतीक्षा, पाऊस न झाल्यास प्रकल्प कोरडा होण्याची भीती - -katepurna-dam
अकोला शहर व परिसराला पाणी पुरवठा करणारा 'काटेपूर्णा प्रकल्प' अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्याचा एक महिना उलटूनही प्रकल्पात नवीन पाण्याचा एक थेंबही जमा न झाल्याने, अकोलेकरांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आजमितीस 'काटेपुर्णा प्रकल्पात' अवघा 4.22 दलघमी इतका पाणी साठा आहे. हा पाणीसाठा शहराला दीड ते दोन महिने पुरेल इतकाच आहे. प्रकल्पातील सध्या असणारा मृतसाठा वापरल्यास हा कालावधी आणखीन दोन ते तीन महिने वाढण्याची शक्यता आहे. जर या प्रकल्पात नव्याने पाणीसाठा झाला नाही, तर अकोलेकरांना पावसाळ्यानंतर पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. "वाशीम आणि मालेगाव परिसरात चांगला पाऊस झाला तरच हा प्रकल्प भरेल", अशी अपेक्षा प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अकोला प्रमाणेच खांबोरा आणि मूर्तीजापूर शहरांनाही याच प्रकल्पातून पाणी पुरविले जात असल्याने जिल्ह्यात पाऊस पडावा अशी प्रार्थना नागरिक करीत आहेत.