अकोला- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. त्यासोबतच विकास आघाडीला झालेल्या वर्षपूर्तीबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवार आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ ते अकोल्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. एक वर्षाचा कार्यकाळ सरकारने पूर्ण केला. पहिलेच तीन चार महिने काम करताना शेतकऱ्यांना कर्जमाफी करून एक धाडसाचे व जोखमीचे काम या सरकारने केले. कोरोना काळात पगार साडेबारा कोटी आणि सरकारच्या तिजोरीत तीन आणि चार हजार कोटी जमा होत होते, असा काळ आम्ही पाहिलेला आहे. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला लागली आहे. आता आम्हाला खात्री आहे, ज्या विकासाचे स्वप्न आम्ही पाहिलेले आहे, त्या विकासाला गती मिळेल.
भारतीय जनता पक्षात गेलेल्यांची मुस्कटदाबी
उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत यांच्या संदर्भात निकाल देताना सरकारवर ताशेरे ओढले आहे, याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलण्यास टाळून मी अजून पाहिलेले नाही, त्यांनतर बोलेन, असे उत्तर दिले. भारतीय जनता पक्षात गेले आणि आपली मुस्कटदाबी होतेय, असा एक वर्ग भाजपमध्ये आहे. दुसरा वर्ग अनेक वर्षे भाजपमध्ये राहिले. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून माणसे गोळा केली आणि त्यांना डोक्यावर बसविले, म्हणून चिडलेला एक वर्ग भाजपमध्ये आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे हे लोक परत आपापल्या पक्षाकडे जाताना आपल्याला दिसेल.
नारायण राणेंवर टीका
आम्ही काही भाजप नाही की दोन महिन्याने आमचे सरकार येईल, असे सांगून निवडणुकीत प्रभाव निर्माण करणेही भाजपला गरज आहे. म्हणजे सध्याची निवडणूक ही अवघड आहे. दुसऱ्या पक्षाची माणसे फोडून आणि सरकार स्थापन करणे, असा व्यभिचार करण्याची ज्यांची मानसिकता आहे, त्याला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. गंजलेल्या तोफांमधून आलेल्या तोफगोळ्यांना उत्तर द्यायची काही गरज नसते, असा प्रतिहल्ला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर मारला. या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार श्रीकांत देशपांडे हे उपस्थित होते.