अकोला- आगामी विधानसभा निवडणुकीची काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार 2 दशकांपासून निवडून आलेला नाही. या ठिकाणी काँग्रेसकडून पार्लमेंटरी बोर्ड स्वराज्य भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीसाठी पार्लमेंट बोर्डातील सदस्यच उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनीच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे या मुलाखती खऱ्या अर्थाने होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तयारी विधानसभेची ! अकोल्यामध्ये काँग्रेसच्या इच्छुकांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या सर्व पक्षांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या सर्व पक्षांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. यावेळी काँग्रेसला भाजपच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचे तगडे आव्हान असणार आहे. विधानसभेसाठी अकोला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर, अकोट, मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या.
काँग्रेसचे अकोला निरीक्षक राहुल ठाकरे आणि आमदार राहुल बोन्द्रे, यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, शहर अध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, हेमंत देशमुख, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांच्यासह आदी मुलाखती घेत आहेत. 15 हजार रुपये उमेदवारी आणि अनुसूचित जाती, जमातीसाठी 10 हजार रुपये शुल्क ठरवण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून 10 ते 15 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर होते. मुलाखतीसाठी उमेदवारांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन केले नाही, त्यामुळे स्वराज्य भवन येथे गर्दी दिसत नव्हती.