अकोला - घरची प्रतिकूल परिस्थिती आणि जन्मजात असलेल्या अपंगत्वावर मात करीत दिव्यांग धीरजने रशियामधील सर्वोच्च हिमशिखर माउंट एल्ब्रुस सर केले आहे. 16 ऑगस्टला राष्ट्रीय ध्वज फडकवत त्याने आपल्या यशाची पावती दिली. मनगटापासून एक हात व एक पाय नसतानासुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर धीरजने हे हिमशिखर गाठले. भारतातून हे शिखर सर करणारा 'धीरज कळसाईत' हा पहिला दिव्यांग असल्याचे मानले जात आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिव्यांग धीरजने सर केले माउंट एल्ब्रुस - माउंट एल्ब्रुस
घरची प्रतिकूल परिस्थिती आणि जन्मजात असलेल्या अपंगत्वावर मात करीत दिव्यांग धीरजने रशियामधील सर्वोच्च हिमशिखर माउंट एल्ब्रुस सर केले आहे.
धीरजने यापुर्वीच दक्षिण आफ्रिकेतील माउंट किलीमंजारो हे हिमशिखर सर केले होते. हे शिखर सर करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला होता. त्याच्या या विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डला नोंदसुद्धा करण्यात आली. रशियातील माउंट एल्ब्रुस या हिमशिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर असून अत्यंत प्रतिकूल वातावरणात चढाई करावी लागते. हे शिखर बर्फाच्छादित असून तेथील उणे तापमानाचा सामना करत धीरजने आपल्या धाडसी वृत्ती व इच्छाशक्तीचा परिचय देत हे शिखर सर केले आहे. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकालासुद्धा अनेक वेळा हे शिखर सर करणे अशक्यप्राय ठरते. मात्र, धीरजने १५ ऑगस्टला रात्री चढाईला सुरुवात करुन १६ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले. शिखरावर पोहोचताच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्याने भारतीय राष्ट्रध्वज फडकाविला आणि मानवंदना देत राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
हलाखीच्या परिस्थितीतही धीरज परिश्रम करून गिर्यारोहक झाला. आईवडील मोलमजुरी करून त्याचे हट्ट पुरविण्याचा प्रयत्न करतात. त्याचे यश पाहून गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याला साथ देतात. त्याच्या शौर्यामुळे त्याने अकोटचेच नाव नव्हे तर अकोल्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा कोरले आहे.