अकोला- शहरातील न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम या ठिकाणी एका डॉक्टरने बेकायदेशीर गर्भपात सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी रविवारी रात्री छापा टाकला. या पथकासोबत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयामध्ये सुरू असलेला गैरप्रकार आढळल्याने सदर नर्सिंग होम बंद करण्यात आले आहे.
अकोल्यात अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरसह तिघांना अटक रुपेश तेलगोटे नामक बोगस डॉक्टरने न्यू भागवत प्लॉट परिसरात ऋषी नर्सिंग होम हे रुग्णालय काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. या रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात करण्यात येत होते. याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना काही महिन्यांपूर्वी मिळाली होती. बहाकर यांनी त्यांच्या पथकासह या रुग्णालयावर पाळत ठेवली होती. अवैधरित्या गर्भपात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने रविवारी रात्री सापळा रचला आणि बनावट पती तसेच गर्भवती महिला या रुणालयात पाठवण्यात आले. या बनावट पतीने इशारा देताच पोलिसांनी छापा टाकला.
तपासणी केल्यानंतर रुग्णालय तसेच डॉक्टर बोगस असल्याचे आढळून आले. या कारवाईत बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला सहकार्य करणारी परिचारिका वैशाली संजय गवई (राहणार, पातूर) आणि गर्भपाताच्या किट्स आणून देणारा रवी भास्कर इंगळे या तिघांना रविवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने आज (सोमवार) 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईत वैद्यकीय आरोग्य अधिकारी फारुख शेख, अॅड. शुभांगी खाडे, अंकुश गंगाखेडकर, हेमंत मेटकर यांनी सहभाग घेतला. कारवाईनंतर आता आरोग्य विभाग या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर तपासणी करुन देत होते त्या पॅथॉलॉजीची आणि सोनोग्राफी सेंटरची चौकशी करण्यात येणार आहे
आरोग्य विभाग झोपेत
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला बेकायदेशीरपणे बोगस डॉक्टरने चालविलेल्या रुग्णालयाची माहिती मिळाली. परंतु, याची माहिती आरोग्य विभागाला का मिळाली नाही, असा प्रश्न निर्माण झाला केला जात आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.