अकोला - पातूर तालुक्यातील गजानन शिवाजी गवाई (६०) या वृद्धाने एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी.पिंपळकर यांचे न्यायालयात आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली ( Life Imprisonment For Molestation ) आहे. ही घटना नोव्हेंबर २०१९ मध्ये चान्नी पोलिस स्टेशनंतर्गत ( Channi Police Station ) घडली होती.
पाच वर्षीय चिमुरडीचा केला विनयभंग.. आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा १ लाख ६५ हजारांचा दंड
आजीच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयातील युक्तिवादानंतर गजानन शिवाजी गवई यास अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने भा.द.वि. कलम ३७६ (२)(आय) प्रमाणे आजीवन कारावास व ५० हजार रुपे दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, ३७६ (२) (जे) प्रमाणे आजीवन कारावास, व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, कलम ५०६ मध्ये दोन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास व पोक्सो कायदा कलम तीन व चारमध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास आणि कलम सात व आठमध्ये पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली. वरील सर्व शिक्षा सोबत भोगावयाच्या आहेत. वरील प्रमाणे एकूण दंड एक लाख ६५ हजार रुपये आहे. सदर दंडाची रक्कम दोषीकडून वसुल झाल्यास त्यापैकी अर्धी रक्कम पीडितेस देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षातर्फे पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पीएसआय रामराव राठोड यांनी प्रकरणात तपास केला. सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी कामकाज पाहिले.
अशी आहे घटना..
चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ नोव्हेंबर २०१९ रोजी पीडित अल्पवयीन मुलगी (वय ५ वर्षे) हिच्या आजीने पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. तिची नात गजानन शिवाजी गवई याच्या किराणा दुकानावर चॉकलेट आणण्याकरिता गेली होती. दुकानदाराने तिला दुकानामध्ये बोलावून तिचा विनयभंग केला. याबाबत पीडितेने तिच्या आजीस सांगितले असता, पीडितेची आजी दुकानात गेली व त्याला जाब विचारला. तेव्हा उलट तिलाच धमकावून ‘तुमच्या ने जे होते ते करा' अशी धमकी दिली.