अकोला - महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही नराधमांना एमआयडीसी पोलिसांनी आज (शुक्रवार) अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना येवता-मलकापूर रोडवर बुधवारी रात्रीच्या वेळी घडली होती.
सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाच नराधमांना पोलीस कोठडी - अटक
एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे सूत जुळल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाईकांनी त्यांना विरोध केला.
एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे सूत जुळल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे मुलाचा मोठा भाऊ मनोज मोहन राऊत हा त्या महिलेला तुला घरी घेऊन जातो, असे म्हणून तिला घरी नेण्यासाठी बुधवारी रात्री आला. महिलेला घेऊन जाण्यासाठी मनोजसोबत आकाश बाबू दत्ता, आकाश प्रकाश खंडारे, गजानन जगदेव कांबळे, सुनिल गोपाळ अभ्यंकर (रा. शिवनी) हे मित्रही होते. ते येवला-मलकापूर रोडवरील अंधाऱ्या ठिकाणी थांबले. त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्या महिलेला तिथेच सोडल्यानंतर तिला चक्कर आली व ती खाली पडली. यानंतर काहीवेळाने ती उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात आली. वैद्यकीय अधिकारी यांनी तिला त्रास कशामुळे होतो, असे विचारल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयात येवून महिलेची तक्रार नोंदवली. त्यानंतर ठाणेदार किशोर शेळके यांनी सर्व नराधमांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.