अकोला - पेरलेल्या कपाशीच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना सध्या युरिया खताची गरज आहे. परंतु, शेतकऱ्यांना दोनच पोती युरिया खताची विक्री केल्या जात असून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अकोल्यातील एका कृषी केंद्रावर हा प्रकार होत असून ते होलसेल विक्रेतेही असल्याचे समजत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्यासोबत बातचीत केली असता त्यांनी, जिल्ह्यात अजून पाच हजार मेट्रिक टन युरिया येत असल्याची माहिती दिली.
पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावल्यामुळे उगवलेल्या पिकांना खतांचा फवारा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सध्या प्रत्येक कृषी केंद्रावर युरिया, डीएपी व इत्यादी खते घेण्यासाठी होत असल्याचे दिसते. जिल्ह्यातील कृषी केंद्रावर युरिया खताचा तुटवडा निर्माण केल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांना या खतासाठी वणवण भटकावे लागत असल्याची स्थिती आहे. यातीलच एक प्रकार संतोषीमाता चौक स्थित एका कृषी विक्री केंद्रावर पहावयास मिळाला. या केंद्रावर शेतकऱ्यांनी युरिया खत खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
अकोल्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खताचा पुरवठा कमी... हेही वाचा -'भाभीजी पापड' खाल्ल्याने होत नाही कोरोना; राजस्थानच्या मंत्र्यांचा अजब दावा..
याठिकाणी सकाळपासून शेतकरी खत खरेदी करिता रांगेत लागले होते. आधार कार्ड घेऊन शेतकऱ्यांना दोनच पोते दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केला जात आहे. शेतकरी जादा पोत्यांची मागणी करीत आहे. तरीपण त्यांचे ऐकण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवण्याचे शासन सांगत असले, तरीही वास्तवात मात्र शासनाचा हा खोटारडेपणा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी ज्या वेळेस युरिया खतासाठी रांगेत लागले होते; त्यावेळेस फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कोणतेही पालन या ठिकाणी होत नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात खत विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे समजले. तसेच त्या ठिकाणी सनिटायझरचा उपयोगही शेतकऱ्यांसाठी करण्यात आला नाही, हे विशेष.
जिल्ह्यासाठी बुधवार (22 जुलै)पर्यंत युरिया खताचा 12 हजार 205 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत 10हजार 113 मेट्रिक टन साठा विकला गेला किंवा वितरकांकडे देण्यात आला आहे. तर 2092 मेट्रिक टन युरिया खताचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. असे असतानाही जिल्ह्यातील खताचा तुटवडा निर्माण होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे