अकोला -अकोला परिमंडळात वीज चोरीच्या या प्रकाराला आवर घालण्यासाठी महावितरण कंपनी सरसावली आहे. 48 तासात परिमंडळाने वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या धाडीत 340 वीज चोरांच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. या चोरांनी जवळपास एक लाख 59 हजार 241 युनिट चोरी केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई सतत सुरू राहणार असल्याचे अधीक्षक अभियंता पवन कुमार कचोट यांनी सांगितले आहे.
अकोला परिमंडळात 48 तासात 340 वीज चोरांवर वीज वितरण कंपनीची कारवाई अकोला परिमंडळात वाशिम, बुलढाणा या जिल्ह्याचा समावेश असून परिमंडळातील थकबाकी वसुलीचे आव्हान समोर असताना परीमंडळाअंतर्गत या तीन जिल्ह्यात वीज चोरीचा वाढलेला प्रकार महावितरणसाठी मोठे आवाहन ठरत आहे. त्यामुळे महावितरणाने वीज चोरांविरुद्ध ऍक्शन घेत वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात 340 विज चोरांवर कारवाई केली आहे.
यामध्ये थेट वीज चोरी किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्यांची संख्या ही 326 आहे. 14 ग्राहकांनी ज्या कामासाठी विजेची मागणी केली होती; त्यासाठी न वापरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असून एक प्रकारे महावितरणची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. एकूण एक लाख 59 हजार 241 युनिट आणि 16 लाख 65 हजार रुपयांच्या या चोरीत जर ग्राहकांनी दंडा सहित रक्कम भरली नाही तर संबंधितांवर विद्युत कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
आधीच थकबाकी वसुली न झाल्याने महावितरण आर्थिक अडचणीतून जात असताना वीज चोरांनी घातलेला धुमाकूळ महावितरणचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे यापुढे वितरण महावितरण अकोला परीमंडळांतर्गत नियमित मोहीम राबविण्यात येऊन वीज चोरांवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.