अकोला - देशातील कुठल्याही बंदला 'महाराष्ट्र चेंबर्स'ने विरोध दर्शविला आहे. बंद दरम्यान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कुठल्याही बंदला प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आंदोलकांच्या दबावाने व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. या दरम्यान उभ्या असलेल्या पोलिसांची भूमिका मात्र बघ्याची होती, असा आरोप 'विदर्भ चेंबर्स'चे अध्यक्ष राजकुमार बिलाला यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पुढे ते म्हणाले, बंद शांततेत होणे गरजेचे आहे. मात्र, बंदला आता हिंसक वळण येत असून राजकीय पक्ष, संघटना त्यांच्या फायद्यासाठी बंद करीत आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा बंदला आता शासनाने व पोलिसांनी परवानगी देणे टाळले पाहिजे, असेही बिलाला म्हणाले.