महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉक्टरअभावी अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बंद, सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू - देवेंद्र फडणवीस

'सत्तेत असताना भाजपने अकोल्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले होते. पण, आताचे राज्य सरकार त्याला मनुष्यबळ पुरवू शकले नाही. त्यामुळे ते हॉस्पिटल सध्या बंद आहे. त्यामुळे आम्ही मनुष्यबळासाठी पाठपुरावा करणार आहे. ऑक्सिजन प्लांटही लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे अकोलाकरांची ऑक्सिजनची चिंता मिटणार आहे', असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Akola
अकोला

By

Published : May 17, 2021, 3:40 PM IST

अकोला - 'भाजप सत्तेत असताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक त्या मशीनही सध्या आलेल्या आहेत. मात्र, हे राज्य सरकार मनुष्यबळ पुरवू शकले नाही. त्यामुळे अशा महामारीच्या काळातही हे 200 बेडचे हॉस्पिटल बंद आहे', अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते अकोल्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची पाहणीही केली.

मनुष्यबळाअभावी अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बंद, सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार - देवेंद्र फडणवीस

अकोला जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा घेण्यासाठी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली. अवघ्या 3 ते 4 मिनिटाच्या छोटेखानी भेटीमध्ये त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घोरपडे यांच्याकडून माहिती घेतली.

'मनुष्यबळाअभावी हॉस्पिटल बंद'

'हे हॉस्पिटल बांधून तयार आहे. मात्र, हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ मंजूर झाले नाही. त्यामुळे हे हॉस्पिटल बंद आहे. या हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आल्यास येथे रुग्णांना सेवा देता येणार आहे. उत्तम दर्जाची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये आहे. राज्य शासनाकडे हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मनुष्यबळासंदर्भात पाठपुरावा करणार आहे', असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

'अकोला जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. रूग्णसंख्या वाढण्यापेक्षा मृत्यूचे प्रमाण वाढणे ही चिंतनीय बाब आहे. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यांच्याकडून उपचारासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेऊन योग्य ती व्यवस्था पुरविण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार आहे', असेही फडणवीसांनी यावेळी म्हटले.

'लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू करणार'

'या रुग्णालयामध्ये नव्याने 60 बेडचे कोरोना वॉर्ड तयार करण्यात आले आहे. मात्र, येथेही मनुष्यबळ नसल्यामुळे हा वॉर्ड अद्यापही कार्यान्वित झाला नाही. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी सीएसआर फंड, तसेच आमदारांनी दिलेल्या निधीतून 140 ऑक्सिजन सिलेंडर जम्बो प्लांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भात जागा पाहणी करण्यात आली आहे. काही दिवसातच हा प्लांट सुरू होणार आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भविष्यात भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत', अशी माहिती फडणवीसांनी दिली.

यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, भाजपा सरचिटणीस संजय कुटे, महापौर अर्चनाताई मसने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळ; मुंबईतील जनजीवन ठप्प; बेस्टसह लोकल, विमानसेवा रखडली

ABOUT THE AUTHOR

...view details