अकोला - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देश सध्या 'लॉक डाउन' आहे. सगळीकडे संचारबंदी आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरात करून ठेवण्यासाठी अनेक नागरिक किराणा दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. अकोला येथील किराणा मार्केटमध्ये नागरिक डाळ, तेल व इतर साहित्य घेण्यासाठी दुकानांमध्ये येत आहेत. किराणा दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
सगळीकडे संचारबंदी आहे, तरीही नागरिक औषधे आणणे, दवाखान्यात जाणे, भाजीपाला आणणे यासह इतर कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना परत घरी जाण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येत आहे. संचारबंदीचा आजचा दुसरा दिवस आहे. परंतु, आज मात्र अकोल्यात पोलिसांनी शांततेत नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नसले तरी नागरिकांची रस्त्यावर धावपळ सुरूच आहेत.