अकोला - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारासाठी काहीच हालचाल होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची नियोजन करण्यासाठी स्वराज्य भवन येथे सायंकाळी बैठक झाली. या बैठकीतही नियोजन कसे करायचे यासाठीच नियोजनावर काथ्याकूट करण्यात आला. तर, काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारासाठी अद्यापही नारळ न फुटल्याने कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच ते सहकार क्षेत्रातील असल्याने भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांना सहकाराचा फायदा होईल असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निमित्त-मात्र हिदायत पटेल यांच्या सोबत फिरत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चार दिवस होऊन अद्यापही प्रचार जोमाने सुरू झालेला नाही. अकोल्यातील लोकसभा रणधुमाळी ही एका बाजूने असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची कुठलीही शक्यता नसल्याची चर्चा आहे. पटेल यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने भाजपची विजयाची चौथी घोडदौड राहणार असल्याची चर्चा मात्र जोरात आहे.
आघाडीची प्रचारासाठी नियोजन बैठक अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पटेल यांना दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत मदत होईल, अशी कुठलीच जमेची बाजू अद्यापही दिसून आलेली नाही. प्रचाराच्या नियोजनासाठी स्वराज्य भवन येथे आज तिसऱ्यांदा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे ज्येष्ठ व विद्यमान पदाधिकारी हजर होते. त्यांनी नियोजनाऐवजी भाषणबाजी करत कोणावरही किंबहुना कोणीही स्वतःहून कुठलीच जबाबदारी न घेतल्याने ही बैठक फक्त चर्चेवर संपली.
काँग्रेसच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नियोजनाच्या बैठकीवर वेळ घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात करावी, असा विचार काही पदाधिकाऱ्यांनी मांडला. तर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून स्वखर्चाने मी त्यांच्यासाठी काम करणार असल्याची घोषणा केली. परंतु, पार्टी फंड किंवा पक्षाकडून येणारा निधी येईपर्यंत कोणीच मदत करणार नसल्याची चर्चा बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना बरेच कार्यकर्ते उठून गेले होते. तर मंचावर बसलेले पदाधिकारीही कंटाळून बाहेर येऊन एकमेकांशी चर्चा करत होते. शेवटच्या क्षणात काँग्रेसचे शहराध्यक्ष बबनराव चौधरी आणि उमेदवार हिदायत पटेल यांनी आपल्या भाषणातून उत्साहपूर्वक न बोलता दोन दोन मिनिटाचे आटोपते भाषण करीत सहकार्य करण्याचे आव्हान केले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे भाजपला किंबहुना वंचित बहुजन आघाडी टक्कर देतील, अशी कुठलीच आशा या बैठकीतून दिसून आली नाही.