अकोला- अकोट तालुक्यातील मोहाळा गावात भाजप अल्पसंख्यांक सेलचे मतीन पटेल यांची हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमध्ये दहा जणांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर मोहाळा गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. देवरी गावातून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इस्ताकउल्लाखा असफाक उल्ला खा असे आहे.
काय आहे घटना -
अकोट तालुक्यातील मोहोळा येथे 24 मे रोजी सायंकाळच्या वेळेस भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी मतीन खा शेरखा पटेल हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत होते. तेव्हा गावातीलच काँग्रेस पक्षाशी संबंधित पटेल गटाच्या लोकांचा वाद झाला होता. या वादातून पटेल गटाच्या जमलेल्या लोकांनी एकत्र येऊन मतीन यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात मतीन यांचा मृत्यू झाला. तर मुमताज पटेल मिया खा पटेल हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.