अकोला - राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबीजवळ केमिकल टँकरला आज दुपारी अपघात झाला. टॅंकरमधून केमिकल गळती होऊ लागल्याने एकच धावपळ उडाली. याघटनेत जीवितहानी झालेली नाही. या अपघातानंतर दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते.
केमिकल टँकरला दाळंबीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात;जीवितहानी नाही
नागपूरकडे जाणाऱ्या केमिकल टँकरचा बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. टँकरमधून गळती होत असल्याने धावपळ उडाली होती. या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
नागपूरकडे हायड्रोजन गॅस नेणारा केमिकल टॅंकर (क्रं. जी.जे.- ०६ - झेड.झेड - ४२४५) हा बोरगाव मंजूकडून मुर्तिजापूरकडे जात होता. यावेळी समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. जी.जे. - १८ - ऐजे - ६८३४) आणि टॅंकरमध्ये दाळंबी नजीक वळणावर अपघात झाला. दरम्यान, अपघातात केमिकल वाहून नेणाऱ्या टॅंकरला मोठ्या प्रमाणात गळती लागली. टॅंकरचा चालक व वाहक हे प्रसंगावधान दाखवत टॅंकरच्या बाहेर पडले.
घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, पोलीस कर्मचारी सतिश सपकाळ, पंचवटकर, डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस गळतीमुळे अनर्थ होऊ नये म्हणून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. या अपघातानंतर महामार्गावरील दुतर्फा वाहतूक विस्कळित झाली होती. दरम्यान, पोलिसांनी काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.