अकोला- अत्यावस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या कोरोनाग्रस्तांची व जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची वाढत्या संख्येबाबात जिल्हाधिकाऱ्यांवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने रविवारी (ता. 11) नाराजी व्यक्त केली. कोरोनाग्रस्तांचा शोध लवकर लावून त्यांना रुग्णालयात वेळीच भरती केल्यास रूग्णांचा मृत्यू होणार नाही, असे निरीक्षण केंद्रीय पथकातील डॉ. मनीष चतुर्वेदी (दिल्ली) व डॉ. महेश बाबू (पॉंडिचेरी) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या स्थितीच्या आढावा बैठकीत नोंदविले. कोरोनाच्या वाढत्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेले पथक सोमवारी (ता. 12) सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचेल.
कोरोनाचा वेगाने प्रसार होणाऱ्या जिल्ह्यातील उपाययोजनांची माहिती व कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तब्बल अडीच तास जिल्हाधिकारी पापळकर यांच्या दालनात पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यासोबत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपायययोजनांची माहिती घेतली.
वैद्यकीय उपचारांची घेतली माहिती
केंद्रीय पथकाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोविडची सद्यस्थिती व त्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेले उपाययोजना याबाबत सादरिकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी पथकातील दोन्ही तज्ज्ञांनी कोविड चाचण्या, त्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांवर केले जाणारे वैद्यकीय उपचार, डॉक्टरांची उपचार पद्धती याबाबत माहिती जाणून घेतली. आताच्या कोविड उद्रेकात कोविड रुग्णांच्या वाढत्या मृत्यू दराबाबत पथकातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. याबाबतही त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सकडून अधिक माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यातील लोकांना होणारा संसर्ग ते रुग्ण संसर्गाच्या विविध पातळीवर पोहोचण्याचा कालावधी, या कालावधीत त्याच्यावर करण्यात आलेल्या उपचाराची माहिती, तसेच रुग्णाच्या सहव्याधींबाबतची स्थिती या विषयांवर पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी बैठकीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी आहे, असे निरीक्षण पथकाने मांडले. त्यामुळे रुग्णांनी चाचणी करून तात्काळ रुग्णालयात दाखल होणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्यानुसार उपचार घेणे याबाबत शासकीय, खासगी डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा व प्रत्यक्ष लोकांमध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत पथकातील डॉक्टरांनी मांडले. जिल्ह्यातील आवश्यक उपचार सुविधा, औषधे व चाचण्यांची सुविधा तसेच ऑक्सिजन उपलब्धता याबाबत पथकाने माहिती जाणून घेतली. तसेच लसीकरणाच्या मोहिमेबाबतही माहिती घेतली.
हेही वाचा -अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णाने केली आत्महत्या