अकोला- संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत जुगार खेळणाऱ्या 28 जणांवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे. गायगाव येथील शेतशिवारातील दोन मजली इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने आज (दि. 23 मे) रात्री छापा टाकला. या छाप्यात पथकाने 28 जणांवर कारवाई केली असून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर उरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा जुगार अड्डा हाय प्रोफाईल असल्याचे यावरून दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी गायगाव येथील एका शेतातील दोन मजली इमारतीमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून छापा टाकला. यामध्ये जवळपास 28 जणांना त्यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगारातील दोन लाख रुपये रोख रक्कम, सहा लाख रुपये किंमतीचे बारा दुचाकी किंमत आणि सात लाख रुपयांची एक चारचाकी, असा एकूण 17 लाख रुपयांचा ऐवज पथकाने जप्त केला. हे शेत उरळ येथील प्रकाश वानखडे याचे असून त्याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते. या सर्वांवर उरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पथकाने बड्या घरातील नागरिकांसह काही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही पकडले असल्याचे समजते. हा जुगार अड्डा हायप्रोफाईल असल्याचे या कारवाईवरून सिद्ध होत आहे.