अकोला - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नगरसेवक सतीश ढगे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षातर्फे एकही अर्ज सभापतीपदासाठी नसल्यामुळे ही निवड झाली आहे.
अकोला महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांचा कार्यकाळ संपला होता. यामुळे नव्या सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार भाजपतर्फे नगरसेवक सतीश ढगे यांचा अर्ज भरण्यात आला होता. तर विरोधकांकडून एकही अर्ज सभापतीपदासाठी दाखल झाला नव्हता. त्यामुळे सतीश ढगे हे बिनविरोध निवडून आले असल्याचे सिद्ध झाले होते.
दरम्यान, मनपाच्या सभागृहामध्ये स्थायी समिती सभापती पदाची निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली. सभापतीपदासाठी एकच अर्ज असल्यामुळे भाजपचे नगरसेवक सतीश ढगे यांना स्थायी समिती सभापतीपदी अविरोध निवडण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी सभापती सतीश ढगे यांची मिरवणूकही काढण्यात आली.