अकोला :सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर 13 मे रोजी रात्री शहरातील जातीय दंगल उसळली होती. दंगलीनंतर आज मात्र प्रशासनाने संचारबंदीत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत शिथिलता दिली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी दंगल झाली होती, तिथे मात्र पोलिस बंदोबस्त अजूनही तैनात आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत तणावपूर्ण भागातून सोमवारी सायंकाळी रूटमार्च काढण्यात आला होता.
संचारबंदी लावण्यात आली होती : शहरातील तीन दिवसांपूर्वी व्हायरल पोस्टमुळे शहरात निर्माण झालेल्या जातीय दंगलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर दहाजण जखमी झाले होते. यानंतर शहरातील जुने शहर, डाबकी रोड, सिटी कोतवाली, रामदास पेठ परिसरात संचारबंदी लावण्यात आली होती. तसेच ठीकठिकाणी पोलिस छावणी उभारण्यात येऊन रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. दरम्यान, रस्त्यावर पोलिसांचा मोठा ताफा ठेवण्यात आला होता.
लग्न सोहळ्यासाठी प्रशासनाने दिली परवानगी :दोन दिवसांपासून शहरात शांतता होती. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता दिली आहे. तसेच इंटरनेट सेवाही सुरळीत केली आहे. संचारबंदीत शिथिलता दिल्याने शहरातील रस्त्यावर वर्दळ वाढली होती. तसेच बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. भाजीबाजार, किराणा दुकान आणि शहरातील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. मात्र पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता. कोरोना काळानंतर लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात होत होते. मे महिना हा लग्न सराईचा असल्याने शहरातील जातीय दंगलीमुळे बंधन आले. त्यामुळे अनेकांनी लग्न सोहळा करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली. प्रशासनाने मोजक्याच लोकांमध्ये आणि शांततेत लग्न करण्याची परवानगी दिली होती.