अकोला - जिल्ह्यात आज (शुक्रवार) कोरोना तपासणी अहवालात एकूण 49 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे दिवसअखेर 50 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज सकाळी ४९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व २६ पुरुष आहेत. त्यातील १६ जण सेंट्रल जेल येथील, तीन जण रामदासपेठ, महान येथील तर अडगाव ब्रु, कुटासा, जूने शहर व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण तर वाडेगाव व जेल क्वॉटर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
हेही वाचा -राज्यात शुक्रवारी ९ हजार ६१५ कोरोनाबाधितांची नोंद, २७८ मृत्यू
दरम्यान, काल (गुरुवार) रात्री रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तो रुग्ण बारामीखुर्द, मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. त्यांना २० जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २९ जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून नऊ जणांना अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आठ जणांना अहवालातून वगळले...
अकोला जिल्हा बाहेरील ५६ पॉझिटिव्ह व सात मृत, एक आत्महत्या असे एकूण आठ मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दिलेल्या पत्रानुसार अहवालातून वगळण्यात आले आहे.