अहमदनगर- व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन फोटो डिलीट केल्याने १५ जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कोपरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चालू आहे.
व्हॉट्सअॅपवरुन फोटो का डिलीट केले म्हणून १५ जणांकडून तरुणाला बेदम मारहाण - पोलीस ठाणे
राहुलच्या वाढदिवसानिमित्ताने नितीन शेलारने कोपरगाव शहरातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर राहुलच्या वाढदिवसाचे फोटो पाठवले आणि काही वेळात पुन्हा डिलीट केले होते.
शहरातील राहुल शिरसाटचा १० मे रोजी वाढदिवस होता. राहुलच्या वाढदिवसानिमित्ताने नितीन शेलारने कोपरगाव शहरातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर राहुलच्या वाढदिवसाचे फोटो पाठवले आणि काही वेळात पुन्हा डिलीट केले. याचा राग आल्याने राहुल चंद्रहास शिरसाट याने लोखंडी गजाने नितीन शेलारच्या पाठीवर, पायावर वार करुन जखमी केले. तसेच, कैलास सिताराम सोमासे, अक्षय भालेराव, सुनील बाबुराव मोकळ, रवी वावळ, राहुल खंडीझोड, संतोष होतीस आणि इतर अनोळखी ४ ते ५ तरुणांनी नितीनला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
जखमी नितीनला उपचारासाठी शिर्डीतील श्री साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. नितीन शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील १५ जणांवर रजिस्टर नंबर १६०/२०१९ भा.द.वि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक बोरसे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.