अहमदनगर- पोलीस मुख्यालयातील वसाहतीत एका २३ वर्षीय युवतीचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. वीज महामंडळाच्या गलथान कारभाराने युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी परिसरात असलेल्या वीज महामंडळाच्या कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले.
विजेचा धक्का लागून युवतीचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी महामंडळाचे कार्यालय फोडले - एमबीए
पोलीस मुख्यालयातील वसाहतीत एका २३ वर्षीय युवतीचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. वीज महामंडळाच्या गलथान कारभाराने युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी परिसरात असलेल्या वीज महामंडळाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
पूजा सुनील कुर्हे असे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पावसामुळे घरावरील पत्रे आणि भिंतीमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. या प्रवाहाचा तीव्र झटका बसल्याने पूजाचा मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे, विजेचा प्रवाह उतरत असल्याची तक्रार चार दिवसापूर्वीच वीज महामंडळाकडे करण्यात आली होती. यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने, हा अपघात झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. पूजा ही पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी असून ती एमबीएचे शिक्षण घेत होती.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी परिसरात असलेल्या महामंडळाच्या कार्यलयाचे शटर उघडून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. घटनास्थळावरिल परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील महामंडळाचे दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.