अहमदनगर- आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने 8 एप्रिलला कर्जत-जामखेड वॉटर कप स्पर्धा सन-२०२० ची सुरुवात होणार आहे. कर्जत-जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळ-मुक्त करण्याचे ध्येय निश्चित करूनच या तालुक्यांच्या विकासासाठी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सुनंदा पवार यांनी दिली. या संस्थेच्या जोडीला नाम फाउंडेशन काम करण्यास उत्सुक असल्याचे स्वतः नाना पाटेकर यांनी कळवल्याचे सुनंदा पवार यांनी सांगितले.
जामखेड येथील महावीर मंगल कार्यालयात माजी सैनिक मेळावा व कर्जत जामखेड वॉटर कप स्पर्धा आयोजनाबाबत सृजन फाउंडेशनच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
राज्यातील एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून स्व-कल्पनेतून जलसंधरणाची चळवळ सुरू करण्याचे आमदार रोहित पवार यांनी ठरवले आहे. ही संकल्पना इतर लोकप्रतिनिधींनी सुरू केली तर महाराष्ट्रात जलसंधारणाचे मोठे काम उभे राहु शकते. याच उद्देशाने जलसंधरणाचे काम स्पर्धेच्या स्वरुपात सुरू करत असल्याचे सुनंदा पवार यांनी सांगितले.
वॉटर कप स्पर्धेसाठी एक परिपूर्ण आणि अनुभव संपन्न प्रशिक्षण कार्यक्रम गावकऱ्यांसाठी आखण्यात आला आहे. दुष्काळाला तोंड देताना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींबरोबरच नेतृत्त्व-कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. यासाठी सोप्या भाषेतील काही प्रशिक्षण माहितीपट, प्रशिक्षण माहिती पत्रक तयार केले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी कर्जत-जामखेड तालुक्यात जल कार्यकर्ते कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -.. तर 'अंनिस' दाखल करणार इंदोरीकरांविरोधात तक्रार