अहमदनगर - पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच कालव्याचे दरवाजे बंद केले. यामुळे संतप्त झालेल्या कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडने यांनी मंगळवारी कालव्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडले.
पाण्यासाठी नगराध्यक्षांनी तोडले कालव्याच्या फाटकाचे कुलूप - पाणीवाटप
नाशिकवरुन गोदावरी कालव्यातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच हे पाणी वैजापूरच्या दिशेने गेल्याने कोपरगावकरांमधे संतापाची लाट पसरली होती.
कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर नाशिकवरुन गोदावरी कालव्यातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच हे पाणी वैजापूरच्या दिशेने गेल्याने कोपरगावकरांमधे संतापाची लाट पसरली आहे. यावेळी वहाडने यांनी कालव्याच्या दरवाजाच्याचे कुलूप तोडून फाटक उघडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांनी वहाडने यांची समजूत काढत १९ मे रोजी पूर्ण तळे भरून देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर वहाडने यांनी सहकार्याची भूमिका घेत माघार घेतली आणि लेखी आश्वासनाची मागणी केली. यावेळी शहरातील नागरिकांनी तळ्यावर गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वहाडनेंना समजावल्यानंतर पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी ते फाटक परत लावून घेतले.