कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार माध्यमांसोबत संवाद साधताना अहमदनगर : राज्यात अत्यंत चुरशीची ठरलेल्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी विजय मिळवला आहे. विजयानंतर सत्यजीत तांबेंनी मी लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सत्यजीत तांबे हे कॉंग्रेसचेच आहेत आणि सत्यजीत तांबे कॉंग्रेसमध्ये रहावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
सत्यजीत तांबे कॉंग्रेसचेच : कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीने यावेळी विजय वडेटट्टीवार यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी सत्यजीत तांबेंविषयी सुरू असलेल्या चर्चांवर प्रत्युत्तर दिले आहे. तसेच नाशिक पदवीधर मतदार संघाचे विजयी उमेदवार आमदार सत्यजीत तांबे हे कॉंग्रेसचेच असल्याचे त्यांनी ठाम मत मांडले.
तांबेसाठी प्रयत्न करणार : विजयी वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सत्यजीत जन्मतःच कॉंग्रेसच्या विचारांचे आहे. पक्षातील एखाद्या व्यक्तीबद्दल राग असू शकतो. मात्र त्यांचा पक्षावर राग नाही. युवकांची फळी सोबत असलेल्या युवकाला दूर सारणे हे कॉंग्रेस पक्षाचे नुकसान आहे. त्यामुळे मी दिल्लीत हायकमांड सोबत बोलणार असून राज्यातील नेत्यांचीही मन वळवत मध्यस्थी करणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
भाजपवर केली टीका : विधान परिषदेच्या पाच पैकी चार जागा महाविकास आघाडीनेच जिंकल्याचे आपण मानत असून साईबाबांच्या दरबारी दर्शन करण्यासाठी आलो आहोत. सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीबद्दल नेमक काय झाले याची भूमिका ते मांडणारच आहेत. मात्र, भाजपा आयत्या बिळावर नागोबा असून संधी मिळाली तर ते सोडणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या भूमिकावर प्रश्नचिन्ह : सत्यजीत तांबे आज आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र, ते कॉंग्रेस पक्षाचे असून ते आमचेच आहे, असे ठाम मत वडोट्टीवार यांनी मांडले. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीने पाठींबा दिलेल्या शुभांगी पाटील यांच्यासाठी प्रचाराचे काम कॉंग्रेस पक्षाने केले का?, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सत्यजीत तांबे विजयी :नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. त्या पहिल्या फेरीपासूनच सत्यजित तांबे यांच्यापेक्षा मतांनी पिछाडीवर होत्या. सत्यजीत तांबे यांनी पहिल्या पसंतीची ६८९९९ इतकी मते मिळवली. तर शुभांगी पाटील यांना ३९५३४ मते पडली. पुन्हा एकदा नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे कुटुबियांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
हेही वाचा :Kasba And Pimpri Chinchwad Polls: कसबा, पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा