शिर्डी- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शनिवारी राज्यभरात मंदिर उघडण्याची मागणी करत आंदोलने करण्यात आली. त्याचप्रमाणे साईबाबांच्या शिर्डीत देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा कार्यकर्त्यांकडून साईबाबांच्या चावडी मंदिराजवळ घंटानाद, ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांकडून साईबाबांची महाआरती करण्यात आली. साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी लवकरात लवकर खुले करावे, या मागणीचे निवेदनही यावेळी साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे शिर्डीत आंदोलन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्च पासून शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. भाविकांकडून साईबाबांचे मंदिर खुले करण्याची मागणी होते आहे. मात्र, याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे कान उघडे करण्यासाठी शनिवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून शिर्डीत आंदोलन करण्यात आले. सरकारला हे आंदोलन करूनही जाग येणार नसेल तर यापुढे मोठे आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मंदिर उघडण्यावरून राजकारण-
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारकडून योग्य त्या उपायोजना केल्या जात आहेत. मात्र, मंदिर उघडण्याच्या मुद्यावरून विरोधकांसह हिंदूत्ववादी संघटनाकडून आग्रही मागणी केली जात आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा धोका टळला नाही, गर्दी न करता खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, राज्यात मंदिर खुली करण्याची मागणी अद्यापही जोर धरताना दिसत आहे.
तसेच मंदिर खुली करण्याच्या मागणीवर भाजपकडूनही आंदोलने करण्यात आली होती. तर राज्यपाल कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहले होते. त्यावरून राज्यपालांच्या भूमिकेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही मंदिर न उघडण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या भूमिकेचे साहित्य विश्वातून स्वागत करण्यात आले होते.