शिर्डी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा ९५ वा भाग मंत्री विखे पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पाहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बुलढाणा येथील जाहीर सभेत वीज प्रश्नावरुन उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार (Radhakrishna Vikhe Patil criticizes Uddhav Thackeray) घेतला. मंत्री विखे पाटील म्हणाले की, सत्ता गेल्याचा थयथयाट समजू शकतो परंतू चिडचिड करून आपण काय बोलतो याचे भान ठाकरेंना राहिले नाही.
अन्यथा एकटे पडला : मागील अडीच वर्षांत शेतकरी आठवला नाही. केलेल्या एकाही घोषणेची पूर्तता करता आली नाही, तुम्ही तर बांधावर जावून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे पाप केले असल्याची आठवण करून देत मंत्री विखे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश यापुर्वीच दिले आहेत. तरीही उध्दव ठाकरे यांनी पातळी सोडून केलेले भाषण हे त्यांचाच कमीपणा दाखवणारे आहे. असाच वाचाळपणा करीत राहीलात तर एकटे पडाल असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्याचा उध्दव ठाकरे यांचा आरोप खोटा ठरवताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्ष राज्यात सरकार नावाची व्यवस्था होती काॽ कोव्हीड संकटात शेतकऱ्यांना आणि जनतेला कोणतीच मदत तुम्ही मुख्यमंत्री असताना झाली नाही. प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातल्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा मिळाला अन्यथा काय हाल झाले असते याकडे लक्ष वेधत उध्दव ठाकरे यांनी बोलताना याची जाणीव ठेवली पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले.