अहमदनगर- श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या अमृमहोत्सवदिना निमित्त कर्जत शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी आकर्षक मशाल फेरी काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जतसाठी 75 दिवसांचा टप्पा पूर्ण
स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत करण्यासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 या स्पर्धेसह माझी वसुंधरा या स्पर्धेत भाग घेत कर्जत नगर पंचायतीला उच्च स्थानी नेण्याचा संकल्प शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. कर्जत शहरात दररोज सकाळी एक तास श्रमदान करण्याची गेली दोन वर्षांपासून संकल्पना राबविली जात आहे. ही संकल्पना पुढे नेत यावर्षी कर्जत शहरात स्वच्छता करण्यास 2 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या कामात अनेकांनी अविरत काम सुरू ठेवत सलग 75 दिवसांचा टप्पा पूर्ण केला आहे.
मशालफेरी द्वारे नागरिकांत उत्साह
या अमृतमहोत्सव दिनानिमित्त कर्जत शहरात या सर्व श्रमप्रेमीनी जनजागृतीची भव्य मशाल फेरी काढली. कर्जत शहरातील सर्व नागरिकांना या स्वच्छता यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले. कर्जत शहरात सलग 75 दिवस श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या कामास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी विद्यालयाजवळ एकत्र येत हुतात्मा स्मारकाचे नगर पंचायत स्वच्छता कर्मचार्यांच्या हस्ते पूजन करून या मशाल फेरीस सुरुवात झाली. अग्रभागी ज्येष्ठ श्रमप्रेमी मशाल घेऊन सहभागी झाले होते. सर्वात पुढे चालण्याचा मान नगर पंचायतच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आला. त्याचे मागे संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या वेषातील मुले रथावर होती. त्या मागे एनसीसीचे कँडेट पथक, साईकृपा एकेडमीचे विद्यार्थी, आम्ही कर्जतचे सेवेकरीचे श्रमप्रेमी यांसह कर्जत शहरातील महिला-पुरुष सहभागी झाले होते. यामध्ये तालुक्यातील बहिरोबावाडी, कोळवडी, पठारवाडी, बाभुळगाव खालसा, राशीन, कुंभेफळ, टाकळी खंडे या गावातील युवक ही सहभागी झाले होते. गेली 75 दिवस सर्व श्रमप्रेमींना नियमित साथ देणारा स्वच्छतारथ आपले देखणे रूप घेऊन नागरिकांच्या मागे डौलाने सहभागी होता.