अहमदनगर -कोरोनाच्या नियमांचे पालन करा असे सांगणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची दुर्दैवी घटना आहे. पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली ती अत्यंत चुकीची आहे. जो चुकीचा वागला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कोणीही असो असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.
10 ते 15 जणांवर गुन्हा
गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरूवारी संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात घडली होती. या प्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात 10 ते 15 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर संगमनेरात झालेल्या हल्ल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी महसूलमंत्री थोरात यांच्यांशी संवाद साधला. सर्व प्रशासन यंत्रणा पोलिसांसह काम करत आहे. ते काम नागरिकांच्या हिताकरिता त्यांच्या आरोग्याकरिता आहे, असेही थोरात म्हणाले.