अहमदनगर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाने शिर्डीचे साईमंदीर काल रात्री आठ वाजेनंतर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे साईमंदीर बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे. शिर्डीतील सर्व व्यवहार हे साईमंदीर आणि येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असल्याने शिर्डीत आज शुकशुकाट दिसून येत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या "ब्रेक द चेन" या धोरणांतर्गत राज्यातील मंदिरे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसेच अत्यावशक सेवेची दुकाने सोडून इतर सर्व दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. साईमंदीरासह शिर्डीतील सर्व दुकानेही बंद झाली आहेत. याशिवाय साईसंस्थानाचे भक्तनिवास आणि प्रसादालयही बंद करण्यात आली आहेत.शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दिल्ली आणि दक्षिणेतून कालपासून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. मात्र, आज साईमंदिर बंद असल्याने त्यांना साईबाबा मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करावा लागत आहे. जे भाविक ऑनलाइन साईदर्शन पास काढून आले आहे. अशा भाविकांचे पैसे साई संस्थानकडून परत देण्यात येत आहे. मात्र, अचानक साई मंदिर पुन्हा भाविकाना दर्शनासाठी बंद करण्यात आल्याने शिर्डीत आलेल्या भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी....