अहदमनगर- गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्ताने शिर्डी साईचरणी आंध्रप्रदेश येथील एका साई भक्त परिवाराने १ कोटी रूपये अन्नदानासाठी दान स्वरूपात दिले आहे.
भक्त परिवाराकडून साई चरणी १ कोटीची देणगी
साईबाबांच्या शिर्डीत ३ दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तमय वातावरणात साई संस्थानच्या वतीने साजरा झाला. या उत्सवादरम्यान आंध्रप्रदेश येथील एका साई भक्त परिवाराने आपले नाव जाहीर न करता साई संस्थानला १ कोटी रूपयांची अन्नदानासाठी चेक स्वरूपात देणगी दिली आहे. साई संस्थानच्या वतीने भक्तांसाठी चालवल्या जात असलेल्या साई प्रसादालयात ही देणगी वापरण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे.
साईबाबांना आपले गुरु मानत आपली गुरु दक्षिणा म्हणून साईबाबांना हे एक कोटी रूपयांचे दान दिले, अशी माहिती साई भक्त परिवाराने दिली आहे. साई संस्थानच्या वतीने शिर्डीत चालवले जात असलेल्या साई प्रसादालयात भाविकांना १ जानेवारी २०१७ पासून मोफत भेजन साई संस्थानच्या वतीने दिले जात आहे.
भाविकांकडून येणाऱ्या दानाचा वापर भाविकांसाठीच केला जाते. साईबाबांचे दर्शन करुन भाविक बाहेर आल्यानंतर साई संस्थानच्या वतीने एक बूंदी पाकीट मोफत दिले जाते. त्याचबरोबर साई प्रसादालयात मोफत भोजन, साईनाथ रुग्णालयात मोफत उपचार, अशा अनेक सोयी साई संस्थानकडून भाविकांना मोफत देत आहे.