अहमदनगर- नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात नवख्या खासदार हेमा मालिनी यांना पहिल्या रांगेत स्थान दिले जाते. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या ५० वर्षे देशाची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला मागच्या रांगेत बसवले जाते, हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अहमदनगर येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
'दिल्ली दरबारी शरद पवारांचा अपमान; शपथविधी सोहळ्यात बसवले मागच्या रांगेत' - शरद पवार
नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्ली येथे ५७ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात त्यांना मागच्या रांगेत बसवले होते. त्यावर आज सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्ली येथे ५७ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला सर्व राज्याचे मुख्यमंत्री, अनेक पक्षांचे ज्येष्ठ नेते यांना बोलावण्यात आले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बोलावले होते. त्यानुसार पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांना मागच्या रांगेत बसवले. पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांची जागा न बदलल्याने त्यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्याच पार्श्वभूमीवर आज सुप्रिया यांनी नाराजी व्यक्त केली.
शरद पवार आणि राहुल गांधी यांची गुरुवारी दिल्लीत भेट झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना त्या म्हणाल्या, याबाबत पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेच आहे. दर १५ दिवसाला पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यात भेट होत असते. त्यात नवीन काही नाही. त्यामुळे या चर्चा निराधार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.