अहमदनगर- डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच प्रथमच शहरात आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगर दक्षिणच्या जागेची निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची समजली जात आहे.
सुजय विखेंचे नगरमध्ये जोरदार स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला न सोडल्याने नाराज होत सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करत आघाडीला धक्का दिला. आता ही निवडणूक आघाडी विरुद्ध भाजप न राहता शरद पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे अशी होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
स्वागतासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याबद्दल सुजय विखेंनी समाधान व्यक्त केले. यावेळी विखे म्हणाले, की मी या पक्षात नवीन असलो तरी माझे अनेक जवळचे मित्र या पक्षात आहेत. त्याचबरोबर मी गेल्या ३ वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कामे केली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात माझा विजय हा फक्त औपचारिक बाब असल्याचे ते म्हणाले.
विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट नाकारले जाणार असल्याने गांधीसह अनेक पदाधिकारी नाराज आहेत. याबद्दल सुजय विखेंना विचारले असता ते म्हणाले, की मी भाजपमध्ये प्रवेश करत युतीमध्ये दाखल झालेलो आहे. त्यामुळे खासदार दिलीप गांधीसह भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड या सर्व नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच जे नाराज आहेत त्यांची समजूत काढून मदतीचे आवाहन करणार असल्याचेही विखे म्हणाले.