अहमदनगर- राज्य सरकारकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विरोधकांनी त्यातही राजकारण केले आहे. त्यामुळे आता या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहेत. त्याबाबत लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले आहे. रविवारी राहुरीत त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याच काळात महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षा येऊन ठेपल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा निर्णय घेऊन उच्च तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी यास नकार देत परीक्षा घेण्याची भूमिका घेतली. राज्य सरकार व राज्यपाल यांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच काही विद्यार्थी संघटनांनीही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यावर सरकारकडून बैठक आयोजित करण्यात आला होती, त्यानुसार लवकरच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल असे मत मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केले.