शिर्डी- आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण होईपर्यंत सध्या पंधरा दिवस जास्तीची परवानगी काढून विदेशातून येणारी खासगी विमाने शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरु शकणार आहेत. शिर्डी- तिरुपती देवस्थानांना जोडणाऱ्या सेवेचाही लवकर समावेश होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.
शिर्डी प्रतिनिधी रवींद्र महाले यांनी घेतलेला आढावा शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल इमारतीच्या आणि कार्गो सेवेच्या कामास येत्या एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी शिर्डीत सांगितले.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सन्नाटा; कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
मुंबई-पुणे आणि नागपूरनंतर शिर्डी विमानतळ चौथ्या क्रमांकवर असून देशातील वेगाने वाढणारे एकमेव शिर्डी विमानतळ ठरले असल्याचे काकाणी यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. काकाणी कुटुंबीयांबरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता ते बोलत होते.
शिर्डी विमानतळाची धावपट्टीबरोबरच टर्मिनलचा विस्तार करण्यात येणार असून अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे़. विमाततळावर वीज निर्मितीसाठी सोलर प्लँट टाकण्यात आला आहे. तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत शिर्डी विमानतळाचे नाईट लॅन्डींगचे काम पूर्ण होवून डिसेंबरअखेर नाईट लॅन्डींग सुरू होणार असून यासाठी डीजीसीकडून परवाना मिळेल. दोनशे कोटींचा आराखडा बनवण्यात आला असून यात विमातळाच्या इमारतीचे विस्तारीकरण आणि कॉर्गो सेवा सुरू केली जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून हे काम सुरू होईल, असे काकाणी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -कोण होणार मुख्यमंत्री..? मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसण्यासाठी शिवसेनेच्या 'या' सहा नेत्यांची नावे आघाडीवर
शिर्डी विमानतळावर विमान पार्किंगची क्षमता चारवरून अकरापर्यंत वाढवण्यात येत आहे. येथे इंधन भरण्याचीही सुविधा असून एप्रिलपासून मुंबईत विमान उतरवणे शक्य नसेल, तेव्हा तेथील विमाने शिर्डीत वळवण्यात येतील़. सध्या ही विमाने अहमदाबाद येथे नेण्यात येतात़. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण करेपर्यंत सध्या पंधरा दिवस जास्तीची परवानगी काढून विदेशातून येणारी खासगी विमाने येथे उतरु शकतील. सध्या देशांतर्गत सेवा वाढवण्यावर भर असून दोन वर्षापूर्वी चार विमानाने सुरू झालेल्या या विमानतळावर आता दररोज अठ्ठावीस उड्डाणे होत आहेत. येत्या दोन महिन्यात ही संख्या चाळीसपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे, काकाणी यांनी सांगितले.
यात शिर्डी- तिरुपती देवस्थानांना जोडणाऱ्या सेवेचाही समावेश असेल़. दोन वर्षात पाच लाख प्रवाशांनी शिर्डी विमानसेवेचा लाभ घेतला़ आहे. यावर्षात हा आकडा सात लाखांवर नेण्याचा तर पुढील वर्षी दुप्पट म्हणजे चौदा लाखांवर नेण्याचा कंपनीचा संकल्प असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
सुरेश काकाणी यांनी आजा आपल्या कुटुंबांसह साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी काकाणी कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन साई संस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला. साईबाबांच्या दर्शनानंतर काकाणी यांनी साई संस्थानच्या विश्वस्थ कक्षात शिर्डी विमानतळ विषयी 'ई टीव्ही भारत' चे शिर्डी प्रतिनिधी रवींद्र महाले यांच्यासोबत चर्चा केली.