अहमदनगर- कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश लॉकडाऊन असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीसुद्धा संपूर्ण बंद होते. स्वतः अण्णांनी या परिस्थितीत स्वतःला आपल्या खोलीत क्वारंटाईन करून घेतले होते, पण, आता जनजीवन सुरळीत होत आहे. या कोरोनाच्या काळात राळेगणसिद्धी गाव हे सुरक्षित राहिले आहे.
आपल्या जनांदोलनाच्या माध्यमातून सरकारकडून लोकहिताचे कायदे करण्यास भाग पाडणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे कोरोनाच्या या काळात स्वतः यादवबाबा मंदिरात क्वारंटाईन होते. अण्णा गेल्या दोन महिन्यांपासून कुणालाही भेटले नाहीत. राळेगणसिद्धी परिवारानेसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व नियम-अटी पाळत गावगाडा बंद ठेवला होता.
कोरोनात अण्णा हजारेंचे राळेगणसिद्धी सुरक्षित अण्णांच्या पारनेर तालुक्यातील अनेक मंडळी कामधंदा आणि रोजगाराच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात होती. कोरोनाच्या संकटात गावाकडे परतत असताना अनेकांना विविध अनुभव आले. पण, राळेगणसिद्धी परिवाराने आपल्या हाडामासाची माणसे गावात परतत असताना माणुसकीचा झरा खुला ठेवत त्यांना आपलेसे केले.
दरम्यान, व्हिजिटर्सना सध्या राळेगणसिद्धीत येण्यास परवानगी नाही. मात्र या काळात अण्णांना गावची चिंता आहे. कोरोनाचे संकट आज ना उद्या कमी होईल. पण या दुर्दम्य परिस्थितीत मोठी शहरे असो वा गाव-खेडी, या सर्वांनाच एक धडा या कोरोनाने दिलाय आणि तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा. मात्र, या सुरक्षित अंतरात मानवी दरवाजे उघडी ठेवणे गरजेचे आहे आणि याचाच धडा अण्णांचा राळेगणसिद्धी परिवार सध्या देत आहे.