अहमदनगर - राज्याच्या गृहमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तीवरच जर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतील तर गुन्हेगारांवर धाक काय रहाणार? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळे याठिकाणी सोळा वर्षीय मुलीची झालेल्या संशयास्पद हत्येवर अण्णांनी आपली प्रतिक्रिया देताना सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
'येत्या अधिवेशनात कठोर कायदा करा'
महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने असे प्रकार होत असल्याचे सांगत येत्या अधिवेशनात यावर कठोर कायदा करा अशी मागणीही अण्णा हजारे यांनी केली आहे. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, असे अण्णांनी स्पष्ट केले. आपल्याच तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय मुलीवर घडलेल्या प्रकारावर अण्णा भावूक झाल्याचे दिसून आले. काय या मुलीचा दोष असे म्हणत अण्णांनी गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही, आता गुन्हेगार शोधून त्यांना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अण्णांनी यावेळी केली.
'कायदा-सुव्यवस्था राखणारेच भ्रष्टाचाराच्या आरोपात'
ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायची तेच भ्रष्टाचाराचे आरोपात अडकले आहे. महिला अत्याचार वाढण्यामागे हे पण एक कारण आहे. कारण गुन्हेगारांवर धाक काय राहणार, असे अण्णांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव न घेता निशाणा साधला. त्यामुळे आता सरकारने कडक कायदे करावेत, असे अण्णांनी स्पष्ट केले. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दीड वर्षांनंतर भरले यावर विचारले असता असल्या आयोगांनी काही फरक पडत नाही, देशात घटना सर्वोच्च आहे. घटनेनुसार कठोर कायदे करा आणि त्याची कडक अमलबाजवणी करा, त्यानंतरच गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसेल. यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून पोलिसांचा वचक दिसून येत नाही, त्यामुळे अशा दुर्दैवी घटना होत असल्याचे मत अण्णांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा -VIDEO : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी घोटाळ्याची चौकशी व्हायला पाहिजे - संजय राऊत