अहमदनगर - भाजपतर्फे उपमहापौर असताना श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणाची दखल आता ठाकरे सरकारने त्याच्यावर कारवाई केली आहे.
छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमचे नगरसेवकपद रद्द
भाजपतर्फे उपमहापौर असताना श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणाची दखल आता ठाकरे सरकारने त्याच्यावर कारवाई केली आहे.
नगरविकास विभागाने श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द केले आहे. या प्रकरणाची अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. गुरूवारी (२७ फेब्रुवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान छिंदम अनुपस्थित राहिला. संबंधित प्रकरणावर आज नगरविकास विभागाने निर्णय दिला आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे, हा अपमान असल्याचे नमूद करण्यात आले असून छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
छिंदमच्या संभाषणाची क्लिप बाहेर आल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात असंतोष होता. तसेच भाजपने छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेत पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र, २०१८ मध्ये महापालिका निवडणुकीत छिंदम अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला. आता नगरविकास विभागाने कारवाई केल्याने शिवप्रेमी समाधान व्यक्त करत आहेत.