अहमदनगर- शहर शिवसेनेच्यावतीने आज (गुरुवार) चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कंगनाच्या पोस्टरला जोडे मारुन ते जाळण्यात आले. कंगनाने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतलेली असून आमच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. महाराष्ट्र तिला कदापी माफ करणार नाही. तिचा आगामी कोणताही चित्रपट नगर शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला.
शहरातील दिल्लीगेट येथे झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कंगना रणौत हिच्या मनिकर्णिका या कार्यालयाच्या अवैध बांधकामावर काल (9 सप्टें.) मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली होती. त्यावरुन कंगनाने एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. यामुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाचील लाट उसळली आहे.