शिर्डी -अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमताना शिर्डीतील निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले गेल्याने शिवसैनिकांमधून नाराजीच सुर उमटत आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या विश्वस्त मंडळ यादीत शिवसेनेच्या केवळ चारच संभाव्य विश्वस्तांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे शिर्डीकरांचा विश्वस्त नेमणुकीत विचार करावा, यासाठी आता शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच, स्थानिक शिवसैनिकांना साई संस्थानच्या विश्वस्त पदाची संधी देण्याची मागणी केली जाणार आहे.
विश्वस्त पद न मिळाल्याने शिवसैनिक नाराज
शिर्डी साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने विश्वस्त मंडळ नियुक्त करावे, असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची काल (23 जून) मुंबई येथे बैठक पार पडली. बैठकीनंतर तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली. मात्र, यामध्ये शिवसेनेकडून स्थानिक शिवसैनिकांनी प्राधान्य दिले गेले नाही. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. या यासंदर्भात स्थानिक शिवसैनिकांना साईबाबा संस्थान विश्वस्त पद मिळावे, यासाठी शिर्डीतील शिवसैनिकांचे एक शिष्टमंडळ येत्या दोन दिवसात मुंबईत जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. स्थानिक शिवसैनिकांना विश्वस्त मंडळात प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. याची माहिती शिवसेनेचे नेते संजय शिंदे यांनी दिली आहे.
विश्वस्त मंडळाची यादी जाहीर