अहमदनगर Shirdi Saibaba Trust Donation Problem : 'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांचे देश विदेशात करोडो भक्त आहेत. यातील काही भाविक आपल्या श्रद्धेनुसार साईचरणी ऑनलाईन अथवा शिर्डीतील देणगी काऊंटरवर रोख पैसे दान करत असतात. मात्र, आता साईभक्तांनी साई दरबारातील देणगी काऊंटरवर जमा केलेल्या भक्तांच्या श्रध्देवर आणि पैशावर कोणी डल्ला मारतंय का? हा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं कारणही तसंच आहे. साई संस्थाननं साईमंदिर परिसरात उभारलेल्या देणगी कार्यालयात भाविक रोख रक्कमेची देणगी देण्यासाठी गेला. त्यानंतर त्या भाविकाला दान करतेवेळी रक्कमेची एकच पावती न देता दोन पावत्या दिल्या जातात. त्यातील एक पावती बनावट असल्याची शक्यता आता साई संस्थानकडे आलेल्या एका निनावी तक्रारीवरून व्यक्त होतेय.
'अशी' घडलीय घटना :एक भाविक साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरातील साई संस्थानच्या देणगी काउंटरवर देणगी देण्यासाठी गेला. त्या भाविकानं आपल्या श्रद्धेनुसार देणगीही दिली. त्या भाविकाला देणगी काउंटरवरील कर्मचाऱ्यानं देणगीची एक पावती न देता थेट दोन एकाच नंबरच्या पावत्या दिल्या. हे भाविकाच्या लक्षात आल्यानं त्या भाविकानं साई संस्थानकडे तक्रार केलीय. भाविकाच्या तक्रारीनंतर साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी देणगी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या दुसरं कारण दाखवत तातडीनं दुसऱ्या ठिकाणी बदल्याही केल्यात. मात्र त्यांची बदली करून काहीच होणार नाही. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिर्डीतील जागरुक नागरिकांनी केलीय. या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून यांची चौकशी करण्यात आली, तर असा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता हेही समोर येईल. भाविकानं साई संस्थानकडे या प्रकरणाची तक्रार केलीय. तर साई संस्थान त्या भाविकाचं नाव का जाहीर करत नाही? साई संस्थान आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय का? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार भुजबळ यांनी उपस्थित केलाय.