अहमदनगर - साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या साई पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस असून मंदिर बंद असल्याने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येत नसल्याने भाविक मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानत आहेत.
साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या आज मुख्य दिवशी पहाटे ०४.३० वाजता साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर 'साईसच्चरित्र' या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी वीणा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पोथी आणि मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी प्रतिमा धरून सहभाग नोंदवला.
सकाळी ०६.०० वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व त्यांची सुविद्य पत्नी संगिता बगाटे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपूजा व आराधना विधी करण्यात आली. सकाळी ०९.०० वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते लेंडीबागेत साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पूजन करून ध्वज बदलणे व समाधी मंदिरात काढण्यात आलेल्या प्रतिकात्मक भिक्षा झोळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.