अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदूर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून दोन गटांत झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 17 डिसें) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेतील जखमींना अत्यवस्थेत अहमदनगरला उपचारासाठी हलविण्यात आले असून या घटनेत ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30 वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60 वर्षे), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50 वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेतील मृत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शहादेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी अनेकवेळा वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच स्व. गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटांत हाणामारी झाली. त्यात निवृत्त सैनिक शहादेव दहिफळे याने आपल्याकडे असलेल्या रिवॉल्व्हरमधून सरपंच संजय दहिफळे यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या.
हेही वाचा - साईबाबाच्या दारात पत्नी गायब; दोन वर्षे उलटले तरी शिर्डी पोलिसांचा तपास ढिम्म