महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 6, 2020, 8:53 PM IST

ETV Bharat / state

'प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणुका होईपर्यंत पदावर कायम ठेवा'

महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबईच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदन पाठवण्यात आले आहे. प्रशासक न नेमता आहे त्याच विद्यमान सरपंचांना निवडणुका होईपर्यंत पदावर कायम ठेवण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

Sarpanch council
सरपंच परिषद

अहमदनगर -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून महिन्यात होणाऱ्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका रद्द करून निवडणुका होईपर्यंत त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्यावतीने जाहीर केला आहे. येत्या काळात आणखी १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार या सर्व निवडणुका पुढे ढकलणार असे चिन्ह आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबईच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. प्रशासक न नेमता आहे त्याच विद्यमान सरपंचांना निवडणुका होईपर्यंत पदावर कायम ठेवण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

२०१८-१९ ला दुष्काळ, त्यानंतर अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि आता कोरोनाच्या संकटामुळे गाव पातळीवर अनेक अडचणी आलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटात तर गावपातळीवर ग्राम समितीमुळे कोरोनाला अटकाव करण्याच्या कामात मोठी मदत होत आहे. बाहेरून येणाऱया नागरिकांवर या समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. या परिस्थितीत जर दुसरा प्रशासक नेमण्याचा निर्णय झाला तर कोरोनाचे संकट रोखण्यात अडचणी येतील, अशी भीती सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांनी व्यक्त केली आहे.

सततच्या बाह्य अडचणींमुळे ग्रामपंचायतींना निधी असून तो वापरता आलेला नाही. अनेक योजना प्रलंबित आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट टळेपर्यंत आणि निवडणुका होईपर्यंत आहे त्याच सरपंचांना पदावर कायम ठेवावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे. या निवेदनावर सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा राणी पाटील, उपाध्यक्ष अनिल गीते, सरचिटणीस विकास जाधव यांच्याही सह्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details