अहमदनगर (शिर्डी)Saitirtha Theme Park Laser Show : शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी शिर्डीत थांबावे, त्यांना साई दर्शनानंतर मनोरंजनाचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी साईतीर्थ थीम पार्कच्या साईभक्तांसाठी रोज निःशुल्क दाखवला जाणाऱ्या लेझर शोचं (Laser Show) उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील (Shalinitai Vikhe Patil), मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी आणि मालपाणी परिवार सदस्य उपस्थित होते.
साई भक्तांबद्दलची बांधिलकी जपली : शिर्डीकर नागरिक, विविध व्यावसायिक आणि साई भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात बोलताना शालिनीताई विखे यांनी सांगितलं की, मालपाणी परिवार नेहमीच प्रत्येक क्षेत्रात वेगळेपण जपत असतो, शिर्डीत साईभक्तांसाठी रोज निःशुल्क दाखवल्या जाणाऱ्या लेझर शोच्या माध्यमातून त्यांनी साई भक्तांबद्दलची बांधिलकी जपली आहे. तसंच मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, साईतीर्थ थीम पार्कमध्ये साईभक्तांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तयार केलेला कार्यक्रम एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती देऊन जातो, तशीच अनुभूती या नव्या लेझर शोच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मनिष मालपाणी यांनी साईतीर्थ पार्कमध्ये भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.