भाविकांच्या सुविधेसाठी साई संस्थान सज्ज शिर्डी (अहमदनगर)Saibaba Temple Shirdi :सरत्या वर्षाला निरोप आणि 2024 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार आहेत. या भाविकांना साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधा मिळाव्या यासाठी साईबाबा संस्थान सज्ज असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली. (Sai Bhajan Shirdi)
निवासासाठी ही व्यवस्था :चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. नवीन वर्षा निमित्ताने देश-विदेशातील लाखो भाविक येणार आहेत. त्याचबरोबर राज्यभरातून जवळपास 180 पायी पालख्या येणार असल्याची नोंदणी साईबाबा संस्थानकडे केलेली आहे. या येणाऱ्या साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात 12 हजार 250 चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहेत. तसंच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी साईधर्मशाळा, भक्तनिवास संस्थानच्या 500 रूम आणि या ठिकाणी 34 हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहेत. तसंच साई आश्रम भक्तनिवासस्थान येथे फॅब्रिक शेडमध्ये 19 हजार 500 चौ. फूट अतिरिक्त निवासव्यवस्था करण्यात आलेली आहे.
प्रसादासाठी विशेष नियोजन :नवीन वर्षा निमित्ताने शिर्डीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दररोज साधारण 15 क्विंटलचे 70 हजार मोफत बुंदी प्रसाद पाकिटे आणि विक्रीसाठी दररोज साधारण 30 क्विंटलचे 1 लाख 50 हजार नग मोतीचूर लाडू प्रसाद बनविण्याचे नियोजन आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी साईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साई कॉम्प्लेक्स, गेट नंबर 1 श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ आणि सर्व निवासस्थाने या ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसंच या कालावधीत श्री साई प्रसादालयात दररोज अंदाजे साधारण 60 हजाराहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन घेतील असं नियोजन करण्यात आलेलं आहे.
चहा, कॉफीसह आरोग्य व्यवस्थेची सुविधा :साईबाबांच्या मंदिरात जाणाऱ्या दर्शनरांगेत आणि परिसरात भक्तांना चहा, कॉफी, दूध सुलभतेने मिळावं यासाठी साई कॉम्प्लेक्स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्त निवासस्थान (500 रुम), व्दारावती भक्त निवासस्थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नवीन दर्शन रांग इमारत, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम आणि नवीन श्री साईप्रसादालय आशा ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तातडीच्या सेवेसाठी मंदिर परिसरात नवीन भक्त निवासस्थान, धर्मशाळा आणि श्री साईप्रसादालय येथे रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त :भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, पोलीस कर्मचारी, एक शीघ्र कृतीदल पथक, एक बॉम्ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त संस्थानचे पोलीस निरिक्षक आणि सुरक्षा कर्मचारी असे एकूण 1000 हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे. तसंच मंदिर, निवासस्थान आणि श्री साईप्रसादालय अशा ठिकाणी येणे-जाणेकरिता अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
साईभजने आणि भक्ती गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन :रविवार 31 डिसेंबर 2023 या दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे रात्री 10 वाजता होणारी शेजारती आणि 1 जानेवारी रोजी पहाटेची 5.15 वाजता होणारी काकड आरती होणार नाही. शिर्डी महोत्सवा निमित्ताने रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- मुंबईतच घरे मिळावीत या मागणीवर गिरणी कामगार संघटना ठाम, मुंबईबाहेर जाण्यास नकार
- मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची पुन्हा 'वर्षा'वर भेट, तर्क वितर्कांना उधाण
- 'त्या' महिला कॉन्स्टेबलला नियमानुसार सर्व सहकार्याची ग्वाही; वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची केली होती तक्रार